Wednesday, May 15, 2024

जागतिक कुटुंब दिवस


घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती

इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती

कवयित्री विमल लिमये यांनी केवळ चार ओळीत कुटुंबाची केलेली सुंदर व्याख्या केली आहे. कुटुंब हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शास्त्रीय भाषेत कुटुंब म्हणजे एकमेकांशी नाते असलेल्या माणसांचा समूह. माणसा-माणसांमधील नाती ही जन्मानंतर, विवाहानंतर किंवा दत्तक घेतल्यानंतर निर्माण होतात. कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. विभक्त आणि विस्तारित असे सामान्यपणे कुटुंबाचे दोन  प्रकार आहेत. पण आजच्या बदलत्या काळात केवळ वरील नात्यांवर आधारित समूहांना कुटुंब म्हणण्याची पद्धत मागे पडली आहे. जीवाला जीव देणारी, प्रेम करणारी, मानसिक, शारीरिक आधार देणाऱ्या माणसांना कुटुंब म्हणण्याची प्रथा पडली आहे.  

ह्या वर्षी,  'विविधता आत्मसात करणे आणि कुटुंब बळकट करणे' ही  संकल्पना केंद्रस्थानी ठेवून त्यानुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. ह्या विषयाकडे पाहताना मला विविधतेचे वेगवेगळे कंगोरे दिसतात ते म्हणजे,  एकच व्यक्ती निभावत असलेल्या भूमिका ज्या एकाच कुटुंबातल्या वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना सांभाळतात, मार्गदर्शन करतात. दुसरी म्हणजे सामाजिक लैंगिक लोकांना समाजात, कुटुंबात स्वीकारून, कुटुंब व्यवस्था बळकट करणे. तिसरी म्हणजे, समाजातील, विविध कुटुंबातील रूढी, परंपरा ह्यांचा अंतर्भाव करून कुटुंब बळकट करणे. मुळात विविधता म्हणजे केवळ वेगवेगळी माणसे होत नसून त्या माणसांसोबतच त्यांची असणारे स्वभाव, मत, आर्थिक, सामाजिक, न्यायिक, राजकीय, लैंगिक भिन्नता तसेच त्यांच्या रूढी परंपरा, वैचारिक बैठक ह्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करून कुटुंब व्यवस्था बळकट करणे अपेक्षित आहे. 

आपली भारतीय संस्कृती मातृदेवो भव, पितृ देवो भव ह्याचे संस्कार लहान पणापासूनच देत असते. कुटुंब वास्तव जगात कसं जगावं हे आपल्याला पदोपदी शिकवीत असत. एक माणूस म्हणून घडवीत असतं. गप्पा मारणे, फिरायला बाहेर जाणे, एकत्र टीव्ही पाहणे, जेवण करणे, एकमेकांसोबत वेळ घालवणे, ह्या तश्या पाहायला गेल्या तर छोट्या छोट्या गोष्टी पण फार मोठा परिणाम आपल्यावर करतात.  कोविड काळात ह्या सगळ्याचा आपण अनुभव घेतलाच आहे. आकाशाच्या अनेक छटांप्रमाणे असणारी  मनाने निर्मळ आई, फणसासारखा वरून काटेरी पण आतून गोड असे बाबा , अधिकार गाजवणारी ताई, गोंडस लहान भाऊ , घरात वय होवूनही दरारा असणारे आजोबा, नेहमी पाठीशी घालणारी आजी ही अशी माणसं आहेत वेळ पडली तर आपल्या करता काहीही  करतील. ह्यांची साथ असेल तर कोणत्याही संकटातून बाहेर आपण पडू शकतो. अश्या कुटुंबात आपण अनेक गोष्टी शिकतो. थोरा- मोठ्यांचा आदर करण्यापासून ते भावंडांसोबत भांडत गोष्टी शेअर करण्यापर्यंत. पडत - धडपडत आपण मोठे होतो. आपल्याकडे तर एकत्र कुटुंब पद्धती आहे. बऱ्याचदा नात्यांची नावं देखील आपल्याला माहीत नसतात. पूर्वी पत्रव्यवहार आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात WhatsApp, Instagram, Facebook समुहांद्वारे आपण आजही कुटुंबासोबत जोडले गेलो आहोतच की. 

कुटुंब हा तो वटवृक्ष आहे ज्याच्या सानिध्यात आपण मोठे होतो आणि जो आपल्या पंखाखाली आपण सुरक्षित ठेवतो. एक उत्तम माणूस घडवण्याचे काम परिवार करीत असतो. कोरोना काळात आपल्याला नव्याने समजलेली नात्यांची किंमत, जपत पुढे वाटचाल करूया. 

 तुम्हा सर्वांना जागतिक कुटुंब दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

- Divya Maujekar 

No comments:

Post a Comment

International Day of Parliamentarism

When we hear the word ‘parliament’, the first things that cross our minds are politics, democracy, or power. As a diverse nation with an inh...