एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ,कार्य, जीवन इतकं भारावून टाकणारं असतं की त्या व्यक्तीबद्दल स्तुती स्वरूपात म्हणा किंवा माहिती स्वरूपात म्हणा आपण केलेली टिप्पणी ही नेहमीच आपल्याला तोकडी वाटू लागते. शब्दांच्या महासागराने ज्यांनी साहित्य क्षेत्रात एक नवा अमुलाग्र बदल घडवला नव्हे नव्हे तर एक नवं पर्व सुरू केलं आणि वयाच्या उतारार्धात कॅनव्हास वर रंगाची उधळण करून भल्या भल्यांच्या नजरा थक्क करून सोडल्या ,नोबेल पारितोषिक जिंकणारे साहित्यातील पहिले गीतकार इतकंच नव्हे तर आज पर्यंत ज्यांचं गीत आपण राष्ट्रगीत म्हणून गात आहोत त्याच रविंद्रनाथ टागोर यांच्या बद्दलचा आजचा हा लेख.
रविंद्रनाथ टागोर हे नाव भारदस्त विशेषणांनी समृध्द आहे. कोणासाठी कवी तर कोणासाठी लेखक ,कोणासाठी चित्रकार, नाटककार तर कोणासाठी संगीतकार. एकाच कार्यक्षेत्रापुरती मर्यादित न राहिलेली आणि साहित्याचा तसेच कलेचा थोर व्यासंग असणारी व्यक्ती. त्यांच्या साहित्याबद्दल चित्रांबद्दल बरंच बोललं लिहिलं गेलंय. आज प्रयत्न राहिल तो कथेमागची कथा जाणून घेण्याचा , कवितेमागची स्फूर्ती जाणून घेण्याचा , या यशस्वी पुरुषाच्या आयुष्यात मैत्रीचं दान घेऊन येणाऱ्या , त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या आणि रविंद्रनाथांच्या कवितांमध्ये अजरामर स्थान मिळवणाऱ्या स्त्रियांबद्दल. स्त्री पुरुष नातेसंबंधातील मैत्राबद्दल.
देवेंद्रनाथांच चौदावं मुल म्हणून रविंद्रनाथ जन्माला आले. घरात नातेवाईक ,नोकरचाकर साऱ्यांची वर्दळ असली तरी रविंद्रनाथ एकाकीच वाढले.आई सारखी कामात व्यस्त शिवाय तिची चौदा मुलं ती कोणाकडे आणि किती लक्ष देणार. भल्या थोरल्या भरलेल्या घरात संवेदनशील मुल जसं एकटं वाढेल तस रवींद्रनाथ एकटेपणात वाढत गेले.त्यांचा या एकटेपणाला शह देण्यासाठी त्यांच्या आयुष्यात अवतरली ती कादंबरी. कादंबरी ! त्यांच्यापेक्षा बारा वर्षांनी मोठे असलेले त्यांचे बंधू ज्योतिरिंद्रनाथ यांची पत्नी. रविंद्रनाथ तेव्हा सहा सात वर्षांचे तर कादंबरी आठ नऊ वर्षांची होती. कादंबरीने रविंद्रनाथांच बालपण, किशोरवय, आणि तारुण्य व्यापून टाकलं. त्यांच्या निकट सहवासात आलेली ती पहिलीच स्त्री होती ,त्यांची सखी आणि किंबहुना आईही. या काळात रविंद्रनाथांच्या कवितांमागे कादंबरी उभी होती. कादंबरी बुद्धिमान होती , अभिनेत्री होती उत्तम गायक आणि वाचकही होती. छबी ओ गान या त्यांच्या संग्रहातील कविता त्यांनी कादंबरीलाच अर्पण केल्या आहेत.
वयाच्या सतराव्या वर्षी इंग्लंड ला जाण्यापूर्वी त्यांचा आयुष्यात आली ती अन्नपूर्णा तरखडे - ॲना. तिने रविंद्रनाथांची स्त्री कडे पाहण्याची दृष्टीच बदलली. घराबाहेरच्या जगात त्यांना भेटलेली ती पहिलीच स्त्री होती. कित्येक बंधनानी जखडलेल्या देशाची स्थिती रविंद्रनाथ ओळखून होते पण ॲनाचा रूपानं त्यांना स्त्रीच्या निखळ मैत्रीचा प्रत्यय घेता आला. आयुष्याचा वेगवेगळ्या टप्प्यावर भेटणाऱ्या स्त्रियांचा प्रेम, स्नेह, मैत्रीचा त्यांनी प्रेरक शक्ती म्हणून स्वीकार केला. या स्विकराच्या मुळाशी होती ॲना. त्यांचा 'कविकाहीनितली' नलिनी.
१९१४ साली व्हिक्टोरिया च्या आयुष्यात आलेल्या रविंद्रनाथांच्या गीतांजली ने व्हिक्टोरिया च्या मनात गुरुदेवांबद्दल अपार आदर निर्माण केला. त्या नंतर तब्बल १० वर्षांनी ती रविंद्रनाथांना भेटली पण तिच्या भावना ती शब्द रुपात मांडू शकली नाही. त्या काळात रविंद्रनाथांना फ्लू ने वेढलं होतं, व्हिक्टोरिया ला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिने त्यांची मिरालारिओ नावाच्या बंगल्यात राहण्याची सोय केली. घरातल्या भांड्याकुंड्या पासून ते अगदी नोकरचाकरांपर्यंत सर्व काही तिने त्यांचा सेवेत हजर केलं. तब्बल दोन महिन्यांचा सहवासात व्हिक्टोरियाने रविंद्रनाथांच्या मनात नवनिर्मितीची आशा जागवली. तिने जितकं त्यांचा शब्दांवर प्रेम केलं तितकंच त्यांचा माणुसपणावर. परतीच्या प्रवासात व्हिक्टोरियाने भेट म्हणून दिलेल्या आरामखुर्चीत बसून त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत केलं. पॅरिस मध्ये त्यांचा चित्रांच प्रदर्शन भरलं असता त्याची सगळी जबाबदारी पाहणारी व्हिक्टोरिया होती. व्हिक्टोरियाचा मनात त्यांचा बद्दल नेहमीच स्नेहादराची भावना राहिली.
जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळणारी अशी माणसं आपलं आयुष्य अगदी एका वेगळ्याच वळणावर घेऊन जातात. साहित्याचा मुळाशी गेलं की त्याची उत्पत्ती ही साहित्याईतकीच सुंदर वाटू लागते .
- प्रतिक्षा ओंबळे
No comments:
Post a Comment