Tuesday, February 27, 2024

माझी मराठी

माझी मराठी

माझी भाषा माझी आई 
अर्थ भावनांना देई l 
तिच्या राहावे ऋणात
होऊ नये उतराई ll 

     फक्त मराठी नाही! तर जी आपली मातृभाषा आहे अशी मराठी भाषा ! "संस्कृत" जी पूर्वी देवभाषा होती, अशा संस्कृत नंतर जिचा जन्म झाला ती म्हणजे प्राकृत; माझी मराठी भाषा! आज उपलब्ध असलेले मराठी भाषेतील पहिले वाक्य म्हणजे "श्री चामुण्डराये करवियले." हे वाक्य म्हैसूर जवळ श्रवण - बेळगोळ येथील शिलालेखात आपल्याला आढळून येते. हा लेख इ. स. शके ९८३ म्हणजे ज्ञानेश्वरीपूर्वी ३०७ वर्षी कोरला गेला .
     मराठी भाषेच्या साहित्य परंपरेचा विचार केला जातो त्या वेळी बघणाऱ्याचे डोळे, ऐकणाऱ्याचे कान, घेणाऱ्याचे हात कमी पडतात; कारण अत्युच्च साहित्य परंपरा लाभलेली माझी मराठी सढळ हाताने जो तिचे लेणे लेऊ इच्छितो त्याच्याकडे येते.
     संपूर्ण मराठी भाषेत लिहिला गेलेला सर्वात प्रारंभी चा ग्रंथ म्हणजे "विवेकसिंधू." हा ग्रंथ लिहिणारे मुकुंदराज मराठीचे आद्यग्रंथकार ठरतात. संपूर्ण मराठी भाषेत लिहिलेला हा ग्रंथ इ. स. ११८८ मध्ये त्यांनी लिहिला. 
     मराठी भाषा एक अशी भाषा आहे l जी अत्यंत लवचिक आहे. "वळवावी तशी वळते ती माझी मराठी भाषा..!" असं म्हणताना मन अभिमानाने भरून येतं. आज कोणत्याच भाषेची असणार नाहीत इतकी रूपे मराठीची पाहायला मिळतात. तिचं स्वरूप जरी वेगवेगळं असलं तरी प्रत्येक ठिकाणी ती त्या त्या लोकांची होऊन जाते. 
   खेड्या पाड्यातील रांगडी , अशुद्ध , अपभ्रंश असलेली भाषा असो, कोल्हापुरी ठसक्यात बोलली जाते ती मराठी असो, किंवा मालवणी / कोकणी अशा गोड स्वरात बोलली जाते ती मराठी असो शेवटी असते ती आपली मराठीच! आपली मराठी इतकी श्रेष्ठ आहे की तिची रूपे जरी वेगवेगळी असली ना, तरी एकमेकांच्या मनातील भावना पोहोचवण्याचं काम आपली मराठी करत राहते. 
   पूर्वी मराठी भाषेला राजभाषेचा मान प्राप्त नव्हता पण तो आज काही प्रमाणात मिळाला आहे. इतकंच नाही तर आज प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये मातृस्थानी, मायबोली, मातृभाषा म्हणून माझी मराठी स्थित आहे. कारण आईची भाषाच वेगळी असते. कधी ती नजरेतून बोलते, कधी बोलण्यातून तर कधी स्पर्शातून व्यक्त होते. म्हणूनच तर तिला मातृभाषा म्हणतात! जी पोटातून येते ती मातृभाषा, कळवळ्याची भाषा; आणि जी ओठातून येते ती व्यावहारिक भाषा! 
      आपल्या संस्कृतीमध्ये, इतिहासामध्ये जे संतमहात्मे होऊन गेले त्या सर्वांनी देखील मातृस्वरूप मराठीची अत्यंत मनोभावे सेवा केली आहे. ज्ञानोबा माऊली आपल्या मराठी भाषेचा गौरव करताना लिहितात, 
माझ्या मराठीचीया बोलू कवतुके l परी अमृता तेंही पैजा जिंके l ऐशीं अक्षरें रसिकें l मेळवीन ll
माझी मराठी भाषा इतकी श्रेष्ठ आहे की तिचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. गोडीच्या बाबतीत माझी मराठी "अमृताला" पैजेवर, प्रतिज्ञेवर जिंकू शकते. अशा तऱ्हेची रस, अलंकारयुक्त अमृतमधुर शब्दांची रचना केवळ मराठीत करता येते. अशी आपली मराठी!
       असं सगळं असताना आज आपल्या मराठी भाषेची होत असलेली गळचेपी आपण शांतपणे पाहणे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आजच्या काळात अगदी "शिक्षण" क्षेत्रातही मराठी भाषेला मानाचे स्थान मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतोय! खरंतर पूर्वी होऊन गेलेल्या मोठमोठ्या शिक्षणतज्ज्ञांनीही सांगितलंय की ज्ञान मिळण्यासाठी आपली मातृभाषाच उत्तम! परंतु हे आपल्याला समजणार केव्हा? 
मराठी भाषेची गळचेपी थांबवायची असेल तर आधी मराठी शाळांची अधोगती थांबवायला हवी तरच आपल्याला अधिकार आहे," लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी " म्हणण्याचा! यासाठी इतर भाषांचा राग, अपमान करण्याची गरज नाही. फक्त आपल्या मातृभाषेचा, मायबोलीचा, मराठी भाषेचा विसर कधीही पडून देऊ नका. आपली भाषा सामर्थ्यवान आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण मराठीचा जास्तीतजास्त वापर केला पाहिजे. तेव्हाच आपण अभिमानाने सांगू की ही मातृभाषा माझी मराठी आहे !!! 
शेवटी फक्त इतकेच ,
माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले 
तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले ll 
धन्यवाद !!
 - वादसभा सदस्य पूर्वा शिवप्रसाद काणे

Sunday, February 18, 2024

शिवाजी महाराज आणि व्यवस्थापन कौशल्य


 शिवाजी महाराज आणि व्यवस्थापन कौशल्य

 



 दिनांक १९ नोव्हेंबर, १६७२ रोजी ब्रिटनमध्ये प्रकाशित होणाऱ्या "द लंडन गॅझेट" या वृत्तपत्रात शिवराय आग्र्यातून औरंगजेबाच्या हातावरती तुरी देवून निसटले. याची पहिल्या पानावरती बातमी छापली गेली. त्यात शिवरायांचा उल्लेख "Shivaji : The King of India" असा केला गेला होता. भारतापासून हजारो किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या ब्रिटन या देशाने शिवरायांच्या या पराक्रमाची दखल घेतली. यातून दोन गोष्टी साध्य होतात की, पहिली की, शिवराय हे केवळ महाराष्ट्रापूरते मर्यादित नसून ते अखंड हिंदुस्तानचे राजे होते. आणि दुसरी की, ते फक्त आता भारतापुरते ही मर्यादित नव्हते. आज या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या लोकशाही युगात एकाच राजाचा इतका उदो-उदो का व्हावा ?  त्या राजाच्या विचारात, व्यवहारात आणि चरित्रात असं काय आहे ? की ज्यामुळे या आधुनिक विज्ञानवादी लोकशाही युगात त्या राजाचं स्मरण स्फूर्तीदायक ठरतं ? 'ग्रेट 17 इन द वर्ल्ड' ही जगातील कर्तुत्ववान नामांकित राजांची यादी आहे. ज्यामध्ये सिझर, सिकंदर, हरक्यूलीज, नेपोलियन अशा राजांची नावे आढळतात. भारतातील सम्राट अशोक आणि बादशाह अकबरसुद्धा या यादीत स्थान मिळवतात परंतु या सगळ्यात छत्रपती शिवराय हे एकमेवादित्य राजे झाले, की जे राजे म्हणून जन्माला आले नाहीत. त्यांनी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली नाही. जे स्वकर्तुत्वावर अभिषिक्त राजे झाले. आणि जेव्हा ते अनंतात विलीन झाले तेव्हाही ते राजेच होते.

सांगायची गोष्ट इतकीच, की जगात ग्रेट 17 जे म्हणवले जातात ते या वरील निकषावरती छत्रपती शिवरायांपुढे टिकूच शकत नाहीत. गोव्यात आलेले पोर्तुगीज आपल्या एका पत्रात म्हणतात, शिवाजी महाराजांचे चातुर्य,त्यांचा पराक्रम,  त्यांचे लष्करी डावपेच पाहून त्याची तुलना करायची झाल्यास ती सिझर व सिकंदर यांच्याशी करावी लागेल. त्याच पत्रात पोर्तुगीज म्हणतात, की हे शिवाजी राजे संबंध आशियाशी एकाच वेळी युद्ध करत आहेत. अर्थात त्याकाळी आशिया-युरोप हा एकच खंड असल्याने डच,फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज आणि त्याच बरोबर भारताच्या भू पटलावर थैमान घालणाऱ्या पातशहाया व त्यामधील मंगोल, अफगाण, इराण-इराक, उझबेकिस्तानचे सरदार यांच्याशी शिवरायांनी सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात कडवी झुंज दिली. त्यामूळे शिवराय हे १७ व्या शतकातील आंतराष्ट्रीय कीर्तीचे सेनानी होते.

२९ मे १९४२ रोजी जेव्हा नेताजी सुभाष चंद्र बोस अडोल्फ हिटलरला भेटायला गेले. तेव्हा हिटलर "Shivaji and his Time " हे पुस्तक वाचत होता. ज्यावेळी नेताजींनी हिटलर पुढे भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदतीची इच्छा व्यक्त केली तेव्हा हिटलर म्हणाला, नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या 'हिटलर 'ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे !

आजवरचा इतिहास पाहता छत्रपती शिवरायांसारखा विज्ञानवादी आणि वास्तववादी दृष्टिकोन असणारा राजा जगाच्या इतिहासात दुसरा आढळून येत नाही.कारण जगात १८८८ च्या आसपास स्पेन, ब्राझील, इंग्लंड, फ्रान्स येथे गुलामांच्या विक्री वरती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु त्याच्या १०० वर्षा आधीच १६७७ ला इंग्रज आणि पोर्तुगीजांना दिलेल्या कौलनाम्यात गुलामांच्या विक्रीवरती शिवरायांनी बंदी घातली. विक्रीसाठी आणलेल्या गुलामांना स्वराज्यात आश्रय दिला व नुसता आश्रय न देता त्यांना राज्यकारभारात देखील सामवून घेतले. याचेच उदाहरणच जर पाहायचं झालं तर स्वराज्याचे सरचिटणीस बाळाजी आऊजी.

आज अमेरिकेच्या Boston University मध्ये MBA च्या मुलांना "शिवाजी द मॅनेजमेंट गुरु" हा विषय एक वर्षासाठी शिकवला जातो.जगातील कित्येक राष्ट्रे आपल्या संरक्षणशास्त्रात शिवरायांच्या गनिमी काव्याचा अभ्यास करतात. तर रशिया, व्हिएतनाम, इस्राराइल यांसारख्या देशांनी गनिमी काव्याच्या तंत्रावरती आजच्या घडीला कैक युद्धे जिंकलेली आहेत. इतकेच काय तर त्या काळी युरोपीय देशांना फिरंगी तलवार बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट देवून कित्येक देशांच्या कोसळलेल्या अर्थव्यवस्था  देखील शिवरायांनी उभ्या केल्या.

परंतु मला वाटतं शिवरायांची कीर्ती दिगंत ठरते ती जगाला काय  वाटतं म्हणून किंवा जगासाठी काय केले म्हणून नव्हे तर इथल्या मातीतील लोकांना काय वाटतं म्हणून, कारण इथल्या लोकांसाठी आदर्श ठरल्याने ते विश्वासाठी विश्वगुरू ठरले. खरे म्हणजे,राज्यशास्त्रा मध्ये एक सिद्धांत आहे की एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती असेल ? तर त्या राज्यातील सामान्य प्रजेला,बहुसंख्य रयतेला आणि बहुजनाला ते राज्य आपलं आहे असे वाटणं. तेव्हा ते राज्य उत्तम आहे असे समजावे आणि स्वराज्य या कसोटी वरती पुरेपूर उतरणारे ठरते.

'लोकांनी लोकांसाठी चालवलेली शाही म्हणजे लोकशाही' अशा लोकशाहीचा उदय जगात अलीकडच्या काळात झाला. परंतु अठरा पगड जाती, बारा बलुतेदार, विविध धर्म पंथाच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्य बांधणारे शिवराय होते.

मंगोलियाच्या चंगेज खानाने जागतिक दर्जाचे लष्कर उभे केलं त्याच बरोबर शिवरायांनी देखील लष्कर उभं केलं. परंतु शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही हा दंडक घालून देणारे शिवराय होते. आज संपूर्ण जग स्री-पुरुष समानतेची बात करत करतंय. रांझ्याचा पाटील आणि कल्याणच्या सुभेदाराची सून यांच्या प्रसंगातून स्री संरक्षण आणि गृहरक्षक दल अशा संकल्पनेतून स्त्रियांना आर्थिक सक्षम करणारे शिवराय होते. भारतात चोळांनी व्यापारासाठी आरमार उभं केलं. पण माझ्या महाराष्ट्राला धोका हा जमिनीवरून नसून तो समुद्रावरून आहे हे ओळखून उफाळत्या दर्यात जलदुर्ग बांधून शस्त्र सज्ज आरमार उभं करणारे शिवराय होते.

आज ग्रीन पीस, WWF,  संयुक्त राष्ट्र पर्यावरण, TNC यांसारख्या पर्यावरणीय संस्था पर्यावरण वाचवा म्हणून रोज बोल लावतात परंतु १७ व्या शतकातील एका आज्ञापत्रात शिवराय म्हणतात, "काय म्हणोन की ही झाडे वर्षा दो वर्षांनी होतात ऐसे नाही. वृक्षांच्या अभावे हनिही होते. यासाठी वृक्षतोड करू नये." असे सांगून पर्यावरण संवर्धन करणारे शिवराय होते.

आज महाराष्ट्रातील नेतेमंडळी, वक्ते-व्याख्याते, लेखक-इतिहासकार आपल्या भाषणाची-लिखाणाची सुरुवात "महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज"  म्हणूनच करतात आणि अशानेच की काय आपण शिवरायांना फक्त महाराष्ट्रा पुरतं मर्यादित ठेवलं की काय असा प्रश्न पडतो ? भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावरील प्रस्तावनेत म्हणतात शिवराय हे फक्त महाराष्ट्राचे राजे नसून ते अखंड भारताचे राजे आहेत. परंतु आज आम्ही शिवरायांच्या कार्याची तुलना करायला जातो तेव्हा मला शिवराय हे खरोखरच विश्वगुरू दिसतात....!

 प्राचार्य शिवाजीराव भोसले आपल्या एका व्याख्यानात असे म्हणाले होते की, इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे तर, इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. मला वाटते अफजलखानाचा वध, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्तेखानाची बोटे, सुरतेवर हल्ला या पलीकडे जाऊन,ढाल-तलवारी पलीकडचे विश्वगुरू शिवराय समजणे ही आजच्या काळाची गरज आहे.....

     - प्रज्योत काटकर.

Are We Still Stuck in the Past? Ancient Ideals and the Modern Man

It is estimated that Homo sapiens (today’s humans) emerged around 300,000 years ago in Africa. Homo sapiens was the most intelligent race am...