Sunday, October 27, 2024

अक्षरांच्या पलीकडील भाषा : शिल्पकला


गणपतीच्या जन्माची कहाणी आपण साऱ्यांनीच ऐकली असेल ती म्हणजे, पार्वतीने आपल्या उटण्यापासून आणि विविध फुलांपासून एक मूर्ती घडवून त्यात प्राण अर्पण केले आणि सुंदर असा श्री गणेश घडवला. कदाचित तिथूनच स्फूर्ती घेऊन शिल्पकलेचाही श्री गणेशा झाला असावा असे मला वाटते. दगड धोंड्यांना आकार देऊन पूर्ण एकरुप होऊन शिल्पकार शिल्प घडवतो. त्यामुळेच की काय ते शिल्प इतके जिवंत भासते, की सुखदुःखाने भरलेले आपले मन आपण त्या पाषाणमूर्तीसमोर रिक्त करतो की त्या पाषाणमूर्तीलाही पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खरंतर, शिल्पकारितेला किंवा शिल्पक्रियेला "शिल्पकला" म्हटलेले मला जास्त रुचकर वाटते. आजच्या युगातही ही शिल्पकला आपल्याला अचंबित करते कारण दगडाचे, विविध धातूंचे शिल्प, त्याचे रंग ,कोरीव काम आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही अशक्य वाटते. प्रत्येक शिल्प हे आपल्याला त्या युगातील इतिहास सांगते. मग ते मंदिरातील कोरीव काम असू देत, राजदरबारातील, माहालातील असू दे, नाहीतर एखाद्या निसर्गरम्य अशा प्रदेशातील, जंगलातील, गुहेतील लेणी असू देत, त्या युगांमध्ये घडलेल्या घटनांची सुंदर गुंफण माळेत ओवलेल्या मोत्यांप्रमाणे सादर करते. या शिल्पकला नुसत्या शोभेसाठी बांधलेल्या नसून त्या काळातील संस्कृती, इतिहास आणि अनुभव यांचे द्योतक आहेत. 

        बरं, प्रत्येक युगामधल्या, प्रत्येक प्रदेशाच्या, प्रत्येक घराण्याच्या, शिल्पशैली ह्या वेगवेगळ्या आहेत. बघताक्षणी शैली ओळखू शकणाऱ्या अनेक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. अनेक पिढ्या एखादी वास्तू, संरचना बांधण्यासाठी कामी आल्या आहेत. बृहदेश्वर, अजंठा,  वेरूळ लेणी, खजुराहो, कंबोडिया येथील गुहा, या रचनांनी अनेक वर्षे किंवा शतके तयार होण्यासाठी घेतली आहेत. परंतु तसेच ऊनाकोटी (त्रिपुरा) ची एक प्रचलित दंतकथा म्हणजे एकदा सगळे देवी देवता काशीला मार्गस्थ असताना ऊनाकोटी येथे विश्रामासाठी स्थिरावले. तेव्हा शंकरांनी त्यांना "उद्या पहाटेपर्यंत तुम्ही या दगडांपासून कोटी प्रतिमा बनवा" असे सांगितले. सर्व देवी देवतांना पहाटेपर्यंत फक्त ९९,९९,९९९ दगडाच्या प्रतिमा बनवता आल्या. म्हणून त्याचे नाव "ऊनाकोटी" असे पडले. अशा रातोरात निर्मित असो अथवा अशा रचना जिथे त्यांच्या निर्मात्यांनी अनेक पिढ्या खर्ची घातल्या अशा रचना असो, प्रत्येकात शिल्पकलेचा कस लागलेला जाणवतो. अद्भुत अशा अजरामर वास्तुकलेची किती उदाहरणे आपण बघून थक्क होतो. उंच - उंच डोंगरांवर जिथे साधे चालणेही शक्य नाही अशा ठिकाणी बांधलेली शिल्पे, ठराविक कालावधीतच बांधू शकू अशी शिल्प, संपूर्ण पाषाण खंड एका जागेवरून अनेक किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या ठिकाणी वाहून नेऊन केलेली रचना असो, अशी प्रत्येक कलाकृती म्हणजे पूर्णत्वास आलेले सुंदर स्वप्न.हिऱ्याला पैलू पाडणे जितके अवघड तितकेच शिल्पकलेतील बारकावे शोधून त्यावर संस्कार करणे अवघड. आई - वडील ज्याप्रमाणे मुलांना घडवतात त्याचप्रमाणे तो शिल्पकार त्या शिल्पावरही संस्कार करत असतो. आपल्या मनातील भावनांचा रस तो त्या दगड, माती, कच्च्या सामग्रीत समर्पित करतो आणि ती मूर्ती, ते शिल्प जणू जिवंत होते. जेव्हा शिल्पकार अशी अंतर्बाह्य कलाकृती घडवतो तेव्हाच ती अजरामर होते.  परंतु नदीचा उगम शोधणे जसे अवघड असते तसेच कित्येक वास्तूंमधील शिल्पकारांचे जादुई हात शोधणेही अवघड आहे. गुरू जसा शिष्याच्या कीर्ती  मधला अज्ञात वाटा घेऊन धन्य असतो तसेच बऱ्याचदा तो शिल्पकारही त्याच्या कलाकृतीच्या अजरामरतेत अज्ञात वाटा घेऊन धन्यता पावतो. पण कोणतेही शिल्प बघितल्यावर त्यामागील शिल्पकाराचेही आपण अवबोधन करणे हे मला खूप महत्त्वाचे वाटते. वास्तविक पाहता प्रत्येक गोष्टीत मूर्तिकारिता किंवा शिल्पकारिता दडलेली आहे. एका अणूपासून निसर्ग घडतो तेव्हा प्रकृतीतील शिल्पकारिता असो, अथवा माणसाची, त्याच्या मनाची जडणघडण असो. शिल्पकार जसा त्या शिल्पाचा किंवा मूर्तीचा एक एक पैलू घडवतो तसेच निसर्गाने प्रकृतीचे, अनुभवांनी, भोवतालच्या व्यक्तींनी आणि समाजाने मनुष्याचे हे शिल्प घडवले आहे. 

या कलात्मक रचनांचे शिल्पकार, मूर्तिकार तसेच निसर्गरुपी, मनुष्यरुपी, अनुभवरुपी शिल्पकार आणि या अजरामर कलेला विनम्र अभिवादन. 

- चैत्राली तुळजापूरकर

No comments:

Post a Comment

ज्ञानगंगा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

भारतातील स्त्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पार पाडत आल्या आहेत. रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व स...