'गांधी' नावाची अक्षय विचारधारा
महात्मा गांधींना जाऊन येत्या जानेवारी महिन्यात ७४ वर्षे पूर्ण होतील. इतक्या प्रदीर्घ काळानंतरही जगभरातील प्रभावशाली व्यक्तींची यादी गांधींच्या नावाची दखल घेतल्याशिवाय बनवली जाऊ शकत नाही. याचाच अर्थ असा की आज जिथे एका बाजूला मानवता, सत्य, अहिंसा इ. गोष्टी केवळ नावापुरत्या शिल्लक असल्याचा आभास कित्येकदा होतो तिथेच दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल, कृतींबद्दल आजही अनेकांना जाणून घेण्याची इच्छा वाटते. 'गांधी' या विचारधारेने गांधी ही व्यक्ती जिवंत असताना कित्येकांना जसा जगण्याचा नवा मूलमंत्र बहाल केला तसाच तो आजही बऱ्याच जणांना मिळतो आहे. त्यामुळेच महात्मा गांधींच्या या विचारांमध्ये आणि त्या विचारांवर आधारित कृतींमध्ये असणारी किमया जाणून घेण्यासाठी केवळ कुतूहलापोटी केलेला हा लेखनप्रपंच! यामधील विचार हे मला आजवर गांधींच्या झालेल्या आकलनातून मी मांडलेले आहेत.
महात्मा गांधींच्या आयुष्याचा मोठा कालखंड हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याने व्यापलेला असला तरीही त्यांच्या कार्याची सुरुवात बरीच आधीपासून झालेली आहे. जीवनाच्या याच काळात त्यांना जे अनुभव आले त्यातून त्यांची वैचारिक बैठक पक्की होत गेल्याचे दिसून येते. त्यांचे हेच विचार मला त्यांच्या आयुष्याची प्रमुख वैशिष्ट्ये वाटतात. त्यातील सर्वात प्रमुख बाब म्हणजे साधे राहणीमान होय. गांधींनी 'विचार हीच खरी संपत्ती' हे वाक्य केवळ सुविचारापुरते न ठेवता खरोखर अंगीकारले. स्वतःच्या मूलभूत गरजा ओळखूनही त्याहून जास्तीच्या गोष्टींचा संग्रह करणे ही एक प्रकारची चोरी आहे, असे त्यांचे मत होते. जीवनातील इतक्या छोट्या छोट्या बाबींमधून गांधीजींनी त्यागाचे सामान्य रूप दाखवून दिले. अशा वरवर अतिशय सामान्य दिसणाऱ्या विचारांमधूनच भविष्यातील 'भूदान'सारख्या चळवळीचे बीज पेरले गेले असावे. आचार्य विनोबा भावेंनी पुकारलेल्या त्या चळवळीत कित्येक लोकांनी आपली संपत्ती,जमिनजुमला इ. खुल्या हाताने देऊ केली. गांधींनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलेले हे तत्त्व सामान्य घरातून पुढे येऊन दामदंडनीतीचा वापर करून समाजकारणाच्या नावाखाली संपत्ती गोळा करणाऱ्या हल्लीच्या पुढाऱ्यांनी शिकण्याची गरज आहे. परंतु प्रसंगानुरूप मस्तकावर परिधान करायच्या गांधी टोपीत व अंगावर वागवायच्या खादी डगल्यातच आपली दुष्कृत्ये लपवण्याची ताकद आहे हे ते जाणून असल्याने आज दुर्दैवाने गांधीजी अशांच्या हातातील एक 'कार्ड' बनले आहेत.
गांधीजींचा काळ हा भारतात जातीपातीच्या विचारांनी बुरसटलेला काळ होता. तेव्हा गांधींनी पुढाकार घेऊन सर्व जातीधर्माच्या लोकांना त्यांच्या आश्रमात आश्रय दिला. ज्या काळात मनुष्याच्या जातीवरून त्याचे काम ठरवण्यात येई अशा काळात गांधींनी स्वतः शौचालयांची सफाई आणि मैला उचलण्याची कामेदेखील केली. गांधींच्या या वागणुकीतून जातिव्यवस्था उच्चाटनाच्या शिकवणीसोबतच प्रत्येक कामाकडे आणि काम करणाऱ्याकडे आदरपूर्वक नजरेतून पाहायला हवं ही मूलभूत भावना दिसून येते. कोणतेही काम हलक्या व उच्च प्रतीचे नसून प्रत्येक श्रमिकाचे मूल्य समान असल्याचे गांधी म्हणत. महात्मा गांधींच्या याच विचारांनी प्रेरित होऊन अनेक उच्चशिक्षित श्रीमंत व प्रतिष्ठित लोकांनीही घरोघरी फिरून शौचालयाच्या सफाईची कामे केल्याची उदाहरणे आहेत. या अशा गोष्टींबाबत लोकांच्या मनात असलेली लाज घालवून खऱ्या अर्थाने सेवाधर्माची रुजवणुक गांधींनी केली. एका मनुष्याला दुसऱ्या मनुष्याची सेवा करणे हे स्वतःचे कर्तव्य वाटायला हवे असा गांधींचा मानवतावाद होता. बाबा आमटेंसारख्या गांधीवादी व्यक्तीने आयुष्यभर जोपासलेले कुष्टरोग्यांच्या सेवेचे व्रत हे अशाच तत्वांवर आधारित होते, असे मला वाटते. भारतात जातीपातींचा पगडा असलेल्या वातावरणात अशा रीतीने काम करण्यासाठी गांधीजींना तरुणपणी आफ्रिकेत वर्णद्वेषी वातावरणात आलेले अनुभव निश्चितच कामी आले असावेत. महात्मा गांधींना आफ्रिकेत काम करताना बऱ्याचदा वर्णद्वेषाला सामोरे जावे लागले. पहिल्या वर्गाचे रेल्वेचे तिकीट असतानाही तिसऱ्या वर्गात जाऊन बसावे लागणे, अर्ध्या प्रवासातून प्लॅटफॉर्मवर उतरवून देणे, तेथील उच्चवर्णीयांकडून वर्णद्वेषी शेरेबाजी इ. अन्यायकारक गोष्टींना गांधींना तोंड द्यावे लागले. काही वेळेला अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यावर त्यांना प्रचंड शारीरिक व मानसिक छळालाही सहन करावे लागले. याच अन्यायाला तोंड देण्यासाठी गांधींनी अहिंसेचे शस्त्र स्वीकारले. गांधीजी त्याकाळचे प्रख्यात वकील असल्याने त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना ते सहज धडा शिकवू शकले असते. पण त्यामुळे ही समस्या तात्पुरती थांबली असती. बाकीच्या लोकांना मात्र तो त्रास तसाच सहन करावा लागला असता. म्हणूनच गांधींनी अशा लोकांना एकत्र करून आंदोलनाचा मार्ग अवलंबला. हा मार्ग निश्चितच सोपा नव्हता. शारीरिक व मानसिक शोषण करणाऱ्या लोकांविरुद्ध निर्भयपणे आपली तत्वे व कार्यप्रणाली न बदलता पुन्हा उभे ठाकणे हे अहिंसेचे तत्व म्हणजे प्रचंड साहसाचे आणि चिकाटीचे काम आहे. तरीही अनेकांना 'अहिंसा म्हणजे भ्याडपणा' असे समीकरण कसे वाटू शकते हे एक न उलगडणारे कोडे आहे.
महात्मा गांधींनी या विचारांचा आणि धोरणांचा अवलंब करून सामाजिक क्रांती घडवली असली तरीही त्यांची मते तितकीच मर्यादित नव्हती. राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील विकासातही गांधीजींनी स्वतःच्या तत्वांचा सुसंगतपणा पटवून दिला. गांधीजींवर लहानपणापासून धार्मिक कथांचा, मूल्यांचा पगडा होता. हिंदूंचे आराध्य दैवत असणाऱ्या श्रीरामाचा गांधींवर प्रभाव होता. श्रीरामाने अयोध्येचा धर्माला आणि न्यायाला अनुसरून पाहिलेला कारभार गांधींना आदर्श वाटला. तसेच धर्म, वचन आणि श्रद्धा या मुल्यांसाठी कोणताही त्याग करण्याची आणि स्वतःच्या प्राणाहूनही तत्वांना अधिक महत्त्व देणारी श्रीरामाची नीती गांधीजींनीही स्वतःच्या आचरणात आणण्याचा पूर्ण आयुष्यभर कसोशीने प्रयत्न केला. अनेकांना अशा वागण्यामुळे गांधींचे विचार अव्यवहार्य व वृत्ती हट्टी देखील वाटली. परंतु, गांधींनी आपली तत्वे कधीही सोडली नाहीत. अशा गांधींची भारतात पुन्हा रामराज्याप्रमाणे आदर्श न्यायप्रणाली राबवणारे राज्य आणण्याची महत्त्वाकांक्षा होती. हे जरी खरे असले तरी गांधींच्या स्वप्नातले रामराज्य म्हणजे ईश्वरी अथवा धर्माचा प्रभाव असलेले राज्य नव्हते. 'समाजातील सर्व स्तरातील लोकांना समान न्यायाने वागवणारे राज्य' इतका उदात्त हेतू त्या संकल्पनेत होता. म्हणूनच अशी व्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी अतिशय सूक्ष्म पातळीवरून बदलांची सुरुवात करावी लागणार हे गांधी जाणून होते. त्यामुळेच त्यांनी 'स्वयंपूर्ण खेडी' हा विचार मांडला. एकीकडे शहरांचा विकास होत असताना खेड्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, गावातील छोटे उद्योग जगवायला हवेत, तेथील लोकांना स्वयंपूर्ण बनवायला हवे,असे गांधी म्हणत. किंबहुना म्हणूनच गांधींनी त्यांचे कितीतरी सत्याग्रह, दारूबंदीसारख्या चळवळी, आंदोलने ही खेड्यातून सुरू केली. स्वतःचे आश्रमदेखील त्यांनी खेड्यात उभारले. गांधीजी श्रमशक्तीचे खंदे पुरस्कर्ते होते. म्हणूनच ते यंत्रशक्तीपेक्षा मनुष्यशक्तीला अधिक महत्त्व देत. अनेकांना त्या काळात गांधीजी त्यांच्या या विचारांमुळे औद्योगिक प्रगतीचे विरोधक भासले. पण आजच्या यांत्रिक प्रगतिशील जगात मानवी संबंधांची चणचण निर्माण झाल्यावर तेव्हा गांधीजी नेमके कशाबद्दल आग्रही होते ते स्पष्टपणे कळून येते. गांधीजींच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा प्रत्येक भूमिकेवर मानवतावादी मूल्यांचा थेट प्रभाव दिसून येतो. भविष्यातील अस्थिर जगात मानवतेची सर्वाधिक कमतरता भासणार आहे आणि मानवताच सर्वात महत्त्वाची गोष्ट बनणार आहे हे गांधींनी कदाचित तेंव्हाच ओळखले असावे.
हल्ली, बऱ्याचदा स्वतः काहीही अभ्यास न करता स्वतःवर थोपवलेल्या विचारांना बळी पडून गांधींबद्दल स्वतःची अपरिपक्व मते पसरविणारी मंडळी आजूबाजूला पाहिली की त्यांची दया येते. परंतु, अशांना आयुष्यात कधीतरी गांधींची कालसुसंगतता नक्की समजून 'गांधी' ही एक कालातीत अक्षय विचारधारा असल्याची जाणीव उमजेल याची शाश्वती वाटते आणि एखादा मनुष्य आयुष्यभर आपल्या विचार आणि कृतीतून केवढं महाप्रचंड सामर्थ्य निर्माण करू शकतो याचे केवळ कौतुक वाटत राहते. काळानुसार जितका गांधींचा अभ्यास करत जावं तितके गांधी नव्याने कळतात आणि कळतच राहतात. स्वतःला कितीही टोकाचा त्रास देणाऱ्या माणसालाही माफ करण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवणारा हा माणूस खऱ्या अर्थाने ग्रेट होता हे पटल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच विन्स्टन चर्चिलसारख्या नेत्याने 'नंगा फकीर' म्हणून हिणवल्यावरही किंवा अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या विद्वानाने 'युगपुरुष' म्हणून गौरविल्यानंतरही या दोन्ही उपाध्यांकडे एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे पाहणारे गांधीजी हे मला खऱ्या अर्थाने 'महात्मा' भासतात.
- हृषिकेश विदार